जालना : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी न घेता कंडारी ( ता.बदनापूर ) शिवारातील गट क्रमांक 145 मध्ये ‘आरसीएम प्लांट’ चालवणाऱ्या व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंत्राटदाराला प्रदूषण मंडळाने दणका दिला. या प्लांटचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा तत्काळ बंद करण्याचे आदेश एमपीसीबीने दिले.

विनोद काळे / कैलास गजर | जालना : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी न घेता कंडारी ( ता.बदनापूर ) शिवारातील गट क्रमांक 145 मध्ये ‘आरसीएम प्लांट’ चालवणाऱ्या व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंत्राटदाराला प्रदूषण मंडळाने दणका दिला. या प्लांटचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा तत्काळ बंद करण्याचे आदेश एमपीसीबीने दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बदनापूर ते चिखली या पंचवीस किलोमीटरच्या रस्त्याचे काम करणाऱ्या व्ही.पी.सेठी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीचा आरसीएम प्लांट कंडारी शिवारातील गट क्रमांक 145 मध्ये सुरू असून या प्लांट संदर्भात कंडारी येथील किशोर कोल्हे या शेतकऱ्याने 17 एप्रिल रोजी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन छत्तपत्री संभाजीनगर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी सोमवार, 16 जून रोजी व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीला हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. तसेच या प्लांटमुळे जल प्रदूषण तसेच वायू प्रदूषण होत असल्याचा ठपका ठेवत या प्लांटचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा तत्काळ बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला दिले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश देताच महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी शुक्रवार, 20 जून रोजी या प्लांटचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. मात्र, जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला की नाही, याबाबत या विभागाकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याबाबत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जगदीश पेंसलवार यांनी सांगितले. याबाबत जालना येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी दीपक बनसोडे यांना विचारले असता ही कारवाई प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जल, वायूचे प्रदूषण
व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी दिलेल्या पत्रात 16 मुद्यांच्या आधारे या कंत्राटदाराने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे कसे उल्लंघन केले आहे, हे स्पष्टपणे सांगितले आहे. जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 मधील तरतुदींचे काटेकोर पालन कऱण्यात आलेले नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे येथील रेडी मिक्स काँक्रिट प्लांटचे उत्पादन तत्काळ थांबविण्याचे निर्देश प्रादेशिक अधिकारी होळकर यांनी दिले आहेत.