Tractor-two-wheeler accident in Kannada: सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर हतनूर उड्डाणपुलाच्या लगत पेट्रोल पंपाच्यासमोर शनिवारी भरदाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पाच वर्षांचा कार्तिक प्रकाश जाधव (रा.लासूर) या चिमुकल्याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला.

कन्नड : सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर हतनूर उड्डाणपुलाच्या लगत पेट्रोल पंपाच्यासमोर शनिवारी भरदाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पाच वर्षांचा कार्तिक प्रकाश जाधव (रा.लासूर) या चिमुकल्याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर इतर तिघेजण गंभीर जखमी असून, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रमेश बाबुराव जाधव (४०, रा.लासूर) हे आपल्या एका नातेवाईकांच्या लग्नासाठी कन्नड येथे आले होते. लग्नसमारंभ उरकून ते आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच- डीए-११६२) याने कन्नड येथून लासूर या गावी जाण्यासाठी निघाले होते. सोबत पुतण्या कार्तिक प्रकाश जाधव (५) आई सुमनबाई बाबुराव जाधव (६०), पत्नी रुपाली रमेश जाधव (३५) हे देखील होते. हतनूर उड्डाणपुलाच्या खाली उतरून ते येत असताना पेट्रोलपंपासमोर अचानक ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक (एमएच-२०-एफयू) हा भरधाव वेगाने हतनूरकडून छत्रपती संभाजीनगर दिशेने आला. अचानक उजवीकडे यू टर्न घेतल्याने ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला दुचाकी धडकली. ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकीवरील रुपाली जाधव या हवेत उडून ट्रॅक्टर ट्रॉलीत फेकल्या गेल्या. कार्तिकच्या छातीला आणि पोटाला मार लागल्याने तो घटनास्थळीच गतप्राण झाला. रमेश जाधव, रुपाली जाधव, सुमनबाई जाधव हे गंभीर जखमी झाले.
वडिलांचे एका वर्षापूर्वी झाले होते निधन
अपघातात मृत्यू पावलेल्या कार्तिकचे वडील प्रकाश बाबुराव जाधव यांचे एका वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. कार्तिकला ऋषी हा जुळा भाऊ देखील आहे. दोघे भाऊ नातलगाच्या लग्नासाठी कन्नड येथे आले होते. कार्तिक काका रमेश जाधव यांच्या दुचाकीवर बसून गावाकडे निघाला होता. आणि या अपघातात सापडला.
रात्री उशिरा गुन्हा दाखल
रात्री उशिरापर्यंत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ट्रॅकर तीसगाव येथील असून, अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली घटनास्थळी सोडून चालक फरार झाला आहे.