जालना : नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रासाठी राज्यातील पहिला सौर उर्जा प्रकल्प जालना येथे साकारण्यात येणार असल्याची माहिती माजीमंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी गुरुवार, 13 फेब्रुवारी रोजी येथे दिली.

जालना : नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रासाठी राज्यातील पहिला सौर उर्जा प्रकल्प जालना येथे साकारण्यात येणार असल्याची माहिती माजीमंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी गुरुवार, 13 फेब्रुवारी रोजी येथे दिली.
आमदार खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार खोतकर म्हणाले, जालना शहराची लोकसंख्या 4 लाखांपेक्षा अधिक आहे. शहरातील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठी 54 ते 58 दशलक्ष लीटर पाण्याची गरज असते. घाणेवाडी जलाशयातून 5 ते 7 दशलक्ष लीटर पाणी मिळते आणि उर्वरित 50 दशलक्ष लीटर पाणी जायकवाडी येथून आणावे लागते. आजपर्यंत 23 दशलक्ष लीटर उपलब्ध होते. तथापि सध्या सहा ते सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. यासाठी महिन्याला 1 कोटींच्या आसपास वीजबिल येते. शहराला दररोज पाणी पुरवठा केल्यास महिन्याला 3 कोटींच्या घरात वीजबिल लागेल. शहरातील पथदिवे यासाठी दर महिन्याला 15 लाख वीजबिल येते. याशिवाय जूनमध्ये सुरू होणार्या एसटीपी प्रकल्पाला 1 कोटी वीजबिल लागणार आहे. एकूण महानगरपालिकेला दर वर्षाला 45 ते 50 कोटींचे वीजबिल भरावे लागणार आहे. इतके पैसे फक्त वीजबिलावर खर्च झाल्यावर विकासकामे कशी होणार, हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे शहरात सौर उर्जा प्रकल्पाची मागणी केली. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता शहरासाठी 100 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यासाठी दोन टप्प्यात निधी मिळणार असून 50 कोटींचा निधी महानगरपालिकेला वर्ग झाला आहे. एप्रिल पर्यंत या प्रकल्पाचे काम 50 टक्के पूर्ण झालेले असेल, अशी माहिती आमदार खोतकर यांनी दिली. उर्वरित निधी पुढील आर्थिक वर्षात मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. घाणेवाडी शिवारातील 70 एकर जागेवर हा सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. यातून 15 मेगावॉट वीजनिर्मिती होईल. ही वीज महानगरपालिका वापरणार आहे. यामुळे पालिकेचा वीज बिलावर होणारा 40 ते 50 कोटींचा खर्च वाचेल आणि हा निधी शहरातील मूलभूत सुविधांसाठी वापरात येईल, असेही खोतकर म्हणाले. राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात होणारा हा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प असून असेच प्रकल्प आता राज्यातील इतर पालिका देखील सुरू करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.