रिसोड : तालुक्यातील कवठा गावात शेतातील गोडाऊन फोडून सोयाबीन चोरी केल्याप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीत एकूण ११ क्विंटल सोयाबीन (किंमत सुमारे ५५ हजार रुपये) लंपास झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी शिवाजी लक्ष्मण खराटे (वय ६३, रा. कवठा, ता. रिसोड) यांनी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील गोडाऊनमधून २ डिसेंबर रोजी रात्री चोरी झाली होती. त्यावेळी ६ क्विंटल सोयाबीन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी रात्री संशयितांनी उर्वरित सोयाबीन ऑटोत भरून नेत असताना फिर्यादी व इतरांनी त्यांना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी ऑटोसह पसार झाले.
या प्रकरणात आरोपी म्हणून विठ्ठल रमेश अवचार (रा. किनखेडा), शुभम बाबू कदम (रा. कवठा), संदीप उर्फ कलम्या आत्माराम पुंड (रा. कवठा) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश असल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेल्या ऑटोतून ५ क्विंटल सोयाबीन नेण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले करीत आहेत.