dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चुलत भावाचा खून, काकावर प्राणघातक हल्ला; पुतण्या व त्याच्या आई-वडिलांना जन्मठेप

मंगरूळपीर : मुरूम पसरवण्याच्या वादातून चुलत भावाचा निर्घृण खून करून काकाला गंभीर जखमी करणाऱ्या पुतण्यासह त्याच्या आई-वडिलांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मंगरुळपीर सत्र न्यायालयाने २३ डिसेंबर २०२५ रोजी हा निकाल दिला.

मंगरूळपीर : मुरूम पसरवण्याच्या वादातून चुलत भावाचा निर्घृण खून करून काकाला गंभीर जखमी करणाऱ्या पुतण्यासह त्याच्या आई-वडिलांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मंगरुळपीर सत्र न्यायालयाने २३ डिसेंबर २०२५ रोजी हा निकाल दिला.

५ जून २०२० रोजी महागाव (ता. कारंजा लाड, जि. वाशिम) येथे मनकर्णाबाई बाबूलाल ठोकळ यांचे कुटुंब त्यांनी विकत घेतलेल्या जागेत मुरूम पसरवत असताना आरोपी प्रफुल ठोकळ याने “माझ्या जागेत मुरूम का पसरवला” या कारणावरून वाद घातला. या वादातून प्रफुल ठोकळ याने लोखंडी गजाने गजानन बाबूलाल ठोकळ यांच्यावर हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवून आणला, तर बाबूलाल ठोकळ यांच्या डोक्यात गज मारून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी प्रफुलचे आई-वडील पंडित ठोकळ व कामिनी ठोकळ यांनीही लोखंडी गजाने मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २३९/२०२० अन्वये भादंवि कलम ३०२, ३०७, ३२३, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सत्र खटला क्र. २५/२०२० मध्ये सरकार पक्षाने १६ साक्षीदार तपासले. सुनावणीअंती आरोपींविरुद्ध खून (३०२) व प्रयत्नपूर्वक खून (३०७) हे गुन्हे सिद्ध झाले.

मंगरुळपीर येथील सत्र न्यायाधीश वैभव व्ही. पाटील यांनी आरोपी प्रफुल ठोकळ, पंडित ठोकळ व कामिनी ठोकळ यांना भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी २०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच आरोपी प्रफुल ठोकळ यास कलम ३०७ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १०,००० रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील पुरुषोत्तम एस. ढोबळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर कोर्ट पैरवी म्हणून संदीप नप्ते यांनी काम पाहिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top