बुलढाणा : शेतकऱ्याची वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये करण्यासाठी तहसीलदाराने तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी सापळा रचून तहसीलदारास रंगेहात पकडले.

हेमंत पाटील असे लाच स्विकारणाऱ्या तहसीलदाराचे नाव आहे. जमीन वर्ग एकमध्ये करुन देण्यासाठी त्याने शेतकऱ्याकडून लाच मागितली. परंतु, लाच देण्याची मानसिकता नसलेल्या शेतकऱ्याने अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानुसार, अधिकाऱ्यांनी सुयोजित सापळा रचून शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला त्याच्या बुलढाणा येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. याकारवाईनंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
लाच स्वीकारल्यानंतर कारवाईचा संशय आल्याने तहसीलदार हेमंत पाटील याने घरातील शौचालयात लाचेची रक्कम टाकून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने तत्काळ त्याला ताब्यात घेण्यात आले होते. बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.