छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार, 14 सप्टेंबर रोजी निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनानंतर मराठा आंदोलकांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जावून लक्ष्मण हाकेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत पोलिसांना निवेदन दिले.

‘कुणबी प्रमाणपत्र मिळवून मराठा समाज ओबीसी प्रवर्गात आला आहे. आम्ही अकरा क्वालिफाइड मुले सुचवतो. त्यांच्याशी तुमच्या मुलींची लग्ने लावा’, असे वादग्रस्त वक्तव्य ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद रविवारी छत्रपती संभाजीनगर शहरात उमटले. सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतीचौकात लक्ष्मण हाकेविरुध्द जोरदार निदर्शने करुन त्यांची प्रतिमा पायदळी तुडवण्यात आली. यावेळी सुनील कोटकर पाटील, निलेश डव्हळे, सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले, सुरेश वाकडे, राजीव थिटे, निवृत्ती डक पाटील आदींसह मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, ओबीसी समाजात साडेतीनशे जाती आहेत, त्यांची आपपसात लग्ने होतात का ? असा सवाल करीत अशी लग्ने होत नसतील तर मराठा समाजाला कशासाठी लक्ष्य करता ? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. तसेच हाके यांनी मराठा समाजातील मुलींबाबत केलेले वक्तव्य विकृत प्रवृत्तीचे आहे. त्यांना जिल्हाबंदी असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ते आल्यास त्यांना धडा शिकविण्यात येईल’, असा इशारा यावेळी सुनील कोटकर पाटील यांनी दिला आहे.