मानोरा : महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या धर्तीवर आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवीत आंदोलन पेटले आहे. उमरीगड येथील युवक सोनू पवार यांनी ९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले असून, सहाव्या दिवशीही (१४ सप्टेंबर) शासनाने दखल न घेतल्याने संतापाची लाट उसळली. दरम्यान, पोहरादेवीच्या महंत रमेश महाराज यांनी उपोषणाला पाठींबा देत लोटांगण आंदोलन पुकारले. या अनोख्या रास्ता रोको लोटांगण आंदोलनाने पोहरादेवी आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

शासनाने नुकताच हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील कुणबी नोंदींना आरक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिम असल्याची स्पष्ट नोंद असूनही, या समाजाकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
बंजारा समाज एकच भाषा, संस्कृती, पोशाख व चालीरीती पाळत संपूर्ण भारतभर आपली ओळख टिकवून आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये या समाजाला अनुसूचित जमाती वा जाती प्रवर्गात स्थान देण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात व्हीजेएनटी व ओबीसीमध्ये ठेवून अन्याय झाल्याची भावना समाजबांधवांमध्ये दाटली आहे.
दरम्यान, रविवारी झालेल्या लोटांगण आंदोलनात ‘एक बंजारा, लाख बंजारा, अभी नहीं तो कभी नहीं’ अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून, शासन-प्रशासनाविरुद्ध रोष वाढत चालला आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी माजी आमदार अनंतकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबुसिंग नाईक यांनी पोहरादेवी गाठून सोनू पवार यांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा दर्शविला. मात्र, शासनाचे प्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी अद्याप भेटीस आलेले नसल्याने बंजारा समाजाचा रोष शिगेला पोहोचला आहे.