शेगाव : स्थानिक महात्मा फुले विद्यालय येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.

शेगाव : स्थानिक महात्मा फुले विद्यालय येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री संजय वामनराव कलारे हे होते. यावेळी मंचावर संस्थेचे व्यवस्थापक डी. के. शेगोकार, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन हाडोळे, संस्थेचे सचिव विलास मसने, संस्थेचे सहसचिव पुरुषोत्तम हुसे, संस्थेचे सदस्य महादेव शेगोकार, गजानन काठोळे, लक्ष्मीकांत लहाने, विनायक घाटोळ, राजेश कलोरे, अमोल धनोकार, विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल चिंचोळकर, पर्यवेक्षक शशिकांत घाटोळ, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मनीषा नावकार, यशवंत विद्या मंदिराचे मुख्याध्यापक राजेंद्र लाड यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव श्री विलास मसने सर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षक सन्मान सोहळ्याची अभिनव कल्पना मांडणारे संस्थेचे सदस्य गजानन काठोळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष संजय कलोरे यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख आणि कौतुक करून सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार संचलन वर्ग आठवीतील विद्यार्थिनी दिव्या राऊत आणि रितिका लांडे यांनी केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक शशिकांत घाटोळ सर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

