वैजापूर : आर्थीक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सोमवार, 18 मे रोजी सकाळी ९ वाजता समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

वैजापूर : आर्थीक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सोमवार, 18 मे रोजी सकाळी ९ वाजता समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्र. १९, जांबरगाव येथे हजारो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधले.
पहिल्यांदाच समृद्धी महामार्ग रोखून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एवढे मोठे आंदोलन करण्यात आले. नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर अशा दोन्ही मार्गांवर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन करत वाहतूक रोखली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांना न्याय द्या…कांद्याला हमीभाव द्या.. उद्धव ठाकरे जिंदाबाद… शिवसेना जिंदाबाद.. बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. दोन्ही बाजूंनी टायर जाळून व गळ्यात कांद्याच्या माळा घालून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक आणखी संतप्त झाले. पोलिसांची गाडी अडवून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना नेत्यांना ताब्यात का घेता ? असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.


