वाशिम : नांदेड–कुर्ला तसेच हिंगोली रेल्वेगाडीच्या उद्घाटन सोहळ्यावर पुन्हा एकदा संकट आले असून विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १९ मे रोजी नांदेड येथे होणारा उद्घाटन कार्यक्रम रेल्वे विभागाने स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पूर्णा–अकोला रेल्वेमार्गावरील प्रवासी व रेल्वे संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उद्घाटनाविनाच रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न : खासदार संजय देशमुख
वाशिम : नांदेड–कुर्ला तसेच हिंगोली रेल्वेगाडीच्या उद्घाटन सोहळ्यावर पुन्हा एकदा संकट आले असून विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १९ मे रोजी नांदेड येथे होणारा उद्घाटन कार्यक्रम रेल्वे विभागाने स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पूर्णा–अकोला रेल्वेमार्गावरील प्रवासी व रेल्वे संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वे संघटनांनी रेल्वे सेवा तातडीने सुरू न झाल्यास ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. विकास आणि जनहित लक्षात घेऊन कोणत्याही राजकीय उपस्थितीशिवाय वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या हस्ते रेल्वे सुरू करावी किंवा थेट सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. मुंबईत आचारसंहिता लागू नसल्याने तेथे उद्घाटन करता येऊ शकते, असेही मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, नांदेड–कुर्ला रेल्वे सेवा उद्घाटनाविना सुरू करता यावी, यासाठी रेल्वे मंत्रालय तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती खासदार संजय देशमुख यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात आजपासून रेल्वे सुरू होते की पुन्हा लांबणीवर पडते, हे आजच स्पष्ट होणार असून जिल्ह्यातील प्रवाशांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. या निर्णयाबाबत हिंगोली जिल्हा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष राकेश भट्ट यांच्यासह दिवाकर माने, नंदकिशोर तोष्णीवाल, शोएब वासेसा, रियाज अली, बाबा गुघे, नवीन चोकडा, दीपक कुलते, महेंद्रसिंह गुलाटी, बच्चुका, मिश्रा, अॅड. ठाकूर, अॅड. अमोल इंगळे, दयानंद दीक्षित आदींनी नाराजी व्यक्त केली आहे.