वाशिम : आरटीई प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या संभ्रमाला अखेर पूर्णविराम मिळाला असून १ किलोमीटर अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच पालकांना दिलासा देत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदतही १८ मार्चवरून वाढवून आता २५ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. महाभूमीने १६ मार्च रोजी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतरच त्याच दिवशी पोर्टलवर हा बदल लागू करण्यात आल्याचे समोर आले आहे.

वाशिम : आरटीई प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या संभ्रमाला अखेर पूर्णविराम मिळाला असून १ किलोमीटर अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच पालकांना दिलासा देत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदतही १८ मार्चवरून वाढवून आता २५ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. महाभूमीने १६ मार्च रोजी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतरच त्याच दिवशी पोर्टलवर हा बदल लागू करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेत यंदा अचानक १ किलोमीटर अंतराची अट लागू करण्यात आल्याने पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांना शाळांचे पर्यायच उपलब्ध होत नव्हते. ग्रामीण भागात तर खासगी शाळा नसल्याने पालकांना अर्ज करणेच कठीण झाले होते. दरम्यान, या अटीविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आल्यानंतर १ किमी अटीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र पोर्टलवर कोणतेही स्पष्ट बदल दिसत नसल्याने पालक संभ्रमातच होते. अखेर सोमवारी पोर्टलवर सुधारणा करण्यात येत १ किमीची अट रद्द करण्यात आली असून आता पूर्वीप्रमाणे अधिक अंतरावरील शाळाही निवडण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासोबतच आधीच अर्ज केलेल्या पालकांना त्यामध्ये आवश्यक बदल (अपडेट) करण्याचीही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत आलेल्या अडचणी दूर होऊन पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस उरले असताना शासनाने मुदत वाढवून २५ मार्चपर्यंत केली आहे. त्यामुळे अधिकाधिक पालकांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. आरटीई कायद्याचा मुख्य उद्देश दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देणे हा आहे. १ किमी अट रद्द झाल्याने आता पालकांना पुन्हा एकदा नामांकित शाळांचा पर्याय उपलब्ध होणार असून गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
—
आधीचा अर्ज करा ‘अनकन्फर्म’
यापूर्वी अर्ज भरला असल्यास पालकांनी लॉगिन करून ‘अर्ज अनकन्फर्म (रद्द) करा’ (फक्त दोन वेळा) पर्यायाचा वापर करून अर्ज अपडेट करावा. शाळा निवडताना १ किमी, १ ते ३ किमी तसेच ३ किमीपेक्षा जास्त अंतरावरील शाळांचे पर्याय उपलब्ध राहणार असून पालकांना इच्छेनुसार निवड करता येईल. मात्र ३ किमीपेक्षा जास्त अंतरावरील शाळा लॉटरीद्वारे मिळाल्यास वाहतुकीचा खर्च पालकांना करावा लागेल. ऑनलाइन अर्जानंतर लॉटरी लागल्यासच प्रवेश निश्चित होणार असून प्रवेश प्रक्रियेपर्यंत आलेले सर्व एसएमएस जतन करून ठेवावेत. पासवर्ड हरवल्यास वेबसाईटवरून तो पुन्हा रिकव्हर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
