Rickshaw caught fire in Chhatrapati Sambhaji Nagar: शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता कॅनॉट प्लेस गार्डन परिसरामध्ये एका रिक्षाने अचानक पेट घेतला. मुख्य रस्त्याच्या मध्यभागी हे वाहन उभे असल्याने अनर्थ टळला.
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारकडून ध्वनी प्रदूषण टाळण्याचे वारंवार आवाहन केले जात असले तरी अति उत्साही तरुणांकडून दिवाळीचे औचित्य साधून शहरात मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्याचा उत्साह कमी होत नाही. या प्रकारामुळे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता कॅनॉट प्लेस गार्डन परिसरामध्ये एका रिक्षाने अचानक पेट घेतला. मुख्य रस्त्याच्या मध्यभागी हे वाहन उभे असल्याने अनर्थ टळला.
पर्यावरण पूरक कमी आवाजाचे ध्वनी प्रदूषण टाळणारे फटाके फोडावेत, याशिवाय हवेतही त्याचे प्रदूषण निर्माण होऊ नये, याचीही काळजी घ्यावी. असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी अति उत्साही तरुणांकडून मोठ्या आवाजाचे आणि आवाजाच्या अति क्षमतेचे फटाके फोडण्याचा धडाका दिवाळीचे औचित्य साधून सुरू आहे. या प्रकारामुळे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता कॅनॉट प्लेस या उच्चभ्रू मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या एका ऑटोरिक्षात फुटलेल्या फटाक्याची ठिणगी गेल्याने त्याने अचानक पेट घेतला. हा प्रकार परिसरातील तरुणांनी पाहिल्यानंतर पेटलेल्या रिक्षाकडे धाव घेत नजीकच्या हॉटेलमधून पाणी आणून रिक्षा भिजवण्याचा प्रयत्न केला. यात एका तरुणाचे हात चांगलेच भाजण्याची माहिती आहे.
प्रशासन सुस्त दिवाळीत मस्त…
छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. दिवाळीच्या औचित्यावर प्रशासनाकडून कोणतेही नियोजन केलेले पाहिले गेले नाही. रस्त्याच्या मुख्यभागी येऊन फटाके फोडण्याचा सर्रास प्रकार मागील दोन दिवसापासून सुरू आहे. हा प्रकार थांबवण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. रस्त्यावरील वाहतुकीला याचा मोठ्या प्रमाणात तोटा होत असून प्रवासी भयभीत होऊन मार्गक्रम करीत आहेत. आज याच प्रकारामुळे कॅनॉट प्लेस मध्ये एका ऑटो रिक्षाने पेट घेतला. मात्र या घटनेची साधी भनकही अग्निशमन विभागाला लागली नाही. त्यामुळे परिसरातील तरुणांनी हा रिक्षा विझविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार प्रशासन सुस्त आणि दिवाळीत मस्त असाच असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.