बुलढाणा: जळगाव जामोद येथे अवैध व अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा: जळगाव जामोद येथे अवैध व अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, गणेश आप्पासाहेब सावंत, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जळगाव जामोद येथील आचल नगर येथे एक इसम आपल्या घरात अनाधिकृत एचटीबीटी बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, जिल्हा निरीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांच्या मान्यतेने सापळा रचण्यात आला.
दोन पंच, सुनील पवार (तालुका कृषी अधिकारी खामगाव) आणि धनंजय देवकर (लिपिक), तसेच प्रमोद गायके (मोहीम अधिकारी), रमेश जाधव (तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद), आणि कृष्णा भगत (कृषी पर्यवेक्षक) यांच्यासह गणेश सावंत हे आचल नगर, जळगाव जामोद येथे पोहोचले. तिथे अशोक रामभाऊ रंदाळे (वय ३९, व्यवसाय सेल्समन, रा. आचल नगर जळगाव जामोद) नावाचा इसम आपल्या घरात अनाधिकृत बियाणे विक्री करताना मिळून आला.
चौकशी केली असता, अशोक रंदाळे याच्याकडे बियाणे विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्याने हे बियाणे सुनगाव येथील सुखकर्ता कृषी केंद्रातून आणल्याचे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता अनधिकृत बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली.
एकूण ५९ पाकिटे जप्त करण्यात आली असून, यापैकी कोणत्याही पाकिटावर उत्पादक, प्रक्रियाकर्ता किंवा विक्रेता यांचा उल्लेख नव्हता. ही पाकिटे शासनाने अनाधिकृत केलेली असून, त्यांच्या विक्रीद्वारे शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती. जप्त केलेल्या पाकिटांमधून प्रत्येकी दोन पाकिटांमधील प्रत्येकी तीन नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले आहेत.
या प्रकरणी, अशोक रामभाऊ रंदाळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३३६(४), ३४०(२) अंतर्गत, बियाणे नियम १९६८ च्या कलम ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, ३८ अंतर्गत, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ च्या खंड ३, ९ अंतर्गत, बीज अधिनियम च्या कलम ७(a), ७(c), ७(d) अंतर्गत, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलम ७, १५, १६ अंतर्गत, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३, ७, ९ अंतर्गत, आणि वजन व मापे पॅकेज केलेल्या वस्तू नियम १९७७ च्या कलम ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र कापूस बियाणे २००९ कलम १२ (९) आणि कापूस बियाणे किंमत नियंत्रण अधिनियम आदेश २०१५ कलम ५ हे देखील लागू आहेत.
सदरची कार्यवाही प्रमोद लहाळे (विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती), मनोजकुमार ढगे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा) आणि बाळासाहेब व्यवहारे उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.