Rain in Sambhajinagar: दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी 20 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान संभाजीनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
छत्रपती संभाजीनगर : दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी 20 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान संभाजीनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगराचे तापमान चाळीशीच्या घरात जाऊन पोहोचले आहे. यामुळे अनेकांना उष्माघाताचाही फटका बसत आहे. वयोवृद्धांसह लहान बालकांच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या असतानाच शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजता दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या आधी शहरात सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे लहान मोठ्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
तब्बल एक तास बरसल्या अवकाळी सरी
शनिवारी साडेसहा वाजतापासून सुरू झालेला पाऊस साडेसात वाजेपर्यंत सुरू होता. यादरम्यान शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले.