Malkapur murder case: दारू प्यायल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती देणारा मित्रच त्याचा मारेकरी निघाल्याची धक्कादायक घटना मलकापुरात उघडकीस आली आहे. पोलीस चौकशी दरम्यान आरोपीने या संदर्भात कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे आरोपीच्या बयानातून समोर आले.

मलकापुर : दारू प्यायल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती देणारा मित्रच त्याचा मारेकरी निघाल्याची धक्कादायक घटना मलकापुरात उघडकीस आली आहे. पोलीस चौकशी दरम्यान आरोपीने या संदर्भात कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे आरोपीच्या बयानातून समोर आले. प्रवीण अजाबराव संबारे (२७ वर्ष रा. बेलाड ता. मलकापूर) असे मृतकाचे नाव आहे.

मृतक प्रवीण संबारे याचा भाऊ सचिन संबारे यांनी मलकापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रवीण संबारे हा मलकापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाठीमागे दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती त्याच्या एका मित्राने सचिनला फोनवरून दिली. घटनेची माहिती मिळताच सचिन संबारे हा आपल्या मित्रांसह घटनास्थळी पोहोचला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रवीणला सचिन आणि त्याच्या मित्राने आधी खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, बेशुद्धावस्थेत असलेल्या प्रवीणला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर, गुरुवारी दुपारी प्रवीणच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्ता सचिनने आपल्या भावाबद्दल फोनवर माहिती देणाऱ्या त्याच्या मित्राचा कॉल रेकॉर्डींग ऐकल्यानंतर प्रवीणची हत्या केल्याचा संशय आला. यासंदर्भात सचिनने पोलीसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी संशयाच्या आधारे मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी वैभव गोपाळ सोनार (२१ वर्ष) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सचिनला पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली. आरोपी वैभवने मृतक प्रवीणचे नाक आणि तोंड रुमालाने बांधून हत्या केल्याची कबुली दिली. मृतक प्रवीण आरोपी वैभवच्या बहिणीवर प्रेम करत असल्याने त्याचे कुटुंब त्रस्त असल्याचेही त्याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. प्रवीणच्या त्रासाला कंटाळून हत्या केल्याचे वैभवने कबुली देताना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.