घरगुती गॅसचा वापर; हॉटेल, खानावळींची झाडाझडती; पुरवठा विभागाने केले 8 सिलेंडर्स जप्त

भोकरदन : शहरातील हॉटेल आणि खानावळींमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रासपणे व्यावसायिक वापर होत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आली आहे. आज पुरवठा विभागाने राबविलेल्या धडक मोहिमेत ८ सिलेंडर्स जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

भोकरदन : शहरातील हॉटेल आणि खानावळींमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रासपणे व्यावसायिक वापर होत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आली आहे. आज पुरवठा विभागाने राबविलेल्या धडक मोहिमेत ८ सिलेंडर्स जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भोकरदन शहर व परिसरात घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत होता, तर दुसरीकडे अनेक हॉटेल व्यावसायिक स्वस्त दरातील घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत महसूल व पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या पथकाने शहरातील सुमारे ४० हॉटेल आणि खानावळींची झाडाझडती घेतली. तपासणी दरम्यान ४० पैकी ८ नामांकित हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर स्वयंपाकासाठी तसेच व्यावसायिक कामासाठी होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने तातडीने हे ८ सिलेंडर्स जप्त केले. नियमबाह्य गॅसचा वापर करणाऱ्या या ८ व्यावसायिकांवर आता कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, सहाय्यक जिल्हाधिकारी बी.सर्वनन, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर व तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत पुरवठा नायब तहसीलदार सदानंद नाईक, पुरवठा निरीक्षक संदीप गाढवे आणि पंजाब सुरडकर यांच्या पथकाने प्रत्यक्ष सहभाग घेतला. हॉटेल आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनी केवळ अधिकृत व्यावसायिक सिलेंडर्सचाच वापर करावा. घरगुती सिलेंडर्स वापरताना आढळल्यास कडक दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

…तर परवाने रद्द होतील

घरगुती वापराचा गॅस हा सामान्य नागरिकांसाठी अनुदानावर उपलब्ध असतो. त्याचा व्यावसायिक वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय होतो. आज आम्ही ४० ठिकाणी तपासणी केली असून ८ जणांवर कारवाई केली आहे. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. कोणत्याही व्यावसायिकाने नियमबाह्य गॅस वापरू नये, अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली जाईल.

 – सदानंद नाईक, पुरवठा नायब तहसीलदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »