जालना : नैसर्गिक आपत्तीपोटी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानावर 40 कोटींचा डल्ला मारणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. गुरुवार, 19 जून रोजी सायंकाळी आणखी 11 जणांवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी निलंबनाची कारवाई केली. यामध्ये 7 ग्राम महसूल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील 4 अव्वल कारकून यांचा समावेश आहे. यासह 35 ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

विनोद काळे / जालना : नैसर्गिक आपत्तीपोटी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानावर 40 कोटींचा डल्ला मारणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. गुरुवार, 19 जून रोजी सायंकाळी आणखी 11 जणांवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी निलंबनाची कारवाई केली. यामध्ये 7 ग्राम महसूल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील 4 अव्वल कारकून यांचा समावेश आहे. यासह 35 ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या घोटाळ्यातील 10 तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार, 13 जून रोजी सायंकाळी उशिरा तडकाफडकी निलंबित केले होते. यातील काही तलाठ्यांनी तब्बल 1 कोटींहून अधिक अनुदान हडपल्याचे चौकशीत उघड झाले होते. दरम्यान, अनुदान लाटणाऱ्यांत दोषी आढळलेल्या इतर तलाठी, कृषि सहायक, ग्रामसेवक यांच्यावर देखील निलंबनाची टांगती तलवार आहे. यातील 11 जणांना गुरुवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले. उर्वरित अधिकारी – कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली.
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावातील २६ ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी तब्बल ३४ कोटी ९७ लाख रुपये हडपले असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले होते. दरम्यान, आतापर्यंत या घोटाळ्यातील 21 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
यांना केले निलंबित
शुक्रवार, 13 जून रोजी निलंबित केलेले ग्राम महसूल अधिकारी :
गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाने, शिवाजी ढालके, कल्याण बमनावत, सुनील सोरमारे, प्रवीण शिनगारे, बी. आर. भुसारे.
गुरुवार, 19 जून रोजी निलंबित केलेले अधिकारी :
डी. जी. कुरेवाड, सचिन बागूल, राजू शेख, एस. एस. कुलकर्णी, ज्योती खरजुले, एस. एम. जारवाल, डी. जी. चांदमारे, आर. बी. माळी, आशिष पैठणकर,सुशील जाधव, व्ही. डी. ससाणे.
35 जणांविरुद्ध चौकशी
अनुदान वाटपात अपहार केल्याप्रकरणी याआधी 10 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आज 11 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात 7 ग्राम महसूल अधिकारी, 4 तहसील कार्यालयातील अव्वल कारकून यांचा समावेश आहे. याशिवाय 35 ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
– डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना