धावडा : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बसस्थानक परिसरात शुक्रवार, २४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास १०० केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्राला (ट्रान्सफॉर्मर) भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. इन्सुलिटर अचानक फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

इन्सुलिटर फुटल्याने आग भडकली; सुमारे ५ लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
धावडा : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बसस्थानक परिसरात शुक्रवार, २४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास १०० केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्राला (ट्रान्सफॉर्मर) भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. इन्सुलिटर अचानक फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

आगीच्या झळा इतक्या तीव्र होत्या की, जवळच असलेले शुभम खराटे यांचे चिकनचे दुकान पूर्णतः जळून खाक झाले. दुकानातील सुमारे ५० जिवंत कोंबड्या, कुलर, वजनकाटा, फर्निचर तसेच इतर साहित्य भस्मसात झाले. याशिवाय दुकानाशेजारी उभी असलेली दुचाकीही जळून खाक झाली. या घटनेत सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीचे रौद्ररूप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांनी वीज विभागाला माहिती देत वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून वीज विभागानेही घटनेची नोंद घेतली आहे.
दरम्यान, या आगीत मोठे आर्थिक नुकसान झालेल्या दुकानदारास शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.