Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होतानाच ईव्हीएम बिघाडाचा मोठा अडथळा जाणवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 25 ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला.
छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आज 13 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होतानाच ईव्हीएम बिघाडाचा मोठा अडथळा जाणवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 25 ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला. ईव्हीएम मशीन बंद असल्याने सकाळी मतदानाला आलेल्या मतदारांचा हिरमोड झाला. अखेर या 25 ठिकाणी नव्या ईव्हीएम मशीन लावून मतदानाला सुरुवात झाली आहे.
बीडच्या परळीमध्येही तेच…
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाबरोबरच बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे सकाळी सात वाजता मतदानाला आलेल्या मतदारांना तब्बल पाऊणतास मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे परळीत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद राहिल्याने सकाळच्याच वेळेत मतदानाची प्रक्रिया काहीशी संथ होताना दिसली.
केरळ पोलिसांच्या तुकड्या तैनात
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सोमवारी एकूण 2040 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मतदानाच्या दिवशी सुरक्षेसाठी संभाजीनगरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलिसांच्या तुकड्याही अतिरिक्त सुरक्षेसाठी बोलवण्यात आल्या आहेत. लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी केरळ पोलीस आणि सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
11 वाजेपर्यंत 19.53 टक्के मतदान
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात काही ठिकाणी ईव्हीएमधील बिघाडीनंतर तांत्रिक अडचण सोडविण्यात आली. सकाळी 11 वाजेपर्यंत या मतदारसंघात 19.53 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली.