local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले. कोर्टाने ही निवडणूक १९९४ ते २०२२ पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिले. विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी ४ आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झाले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यात कोर्टाने ह्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिले. कोर्टाच्या आदेशांनुसार, ओबीसी समुदायाला २०२२ पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून चार महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल. कोर्टाने आपल्या आदेशात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाच वर्षांपासून निवडणूक झाली नसल्याची बाब प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले. ही निवडणूक बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकालाच्या अधीन असतील, असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.
ओबीसी समुदायाला २०२२ पूर्वीचे राजकीय आरक्षण
कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. ओबीसी समुदायाला २०२२ पूर्वी जे राजकीय आरक्षण होते, तेच आरक्षण त्यांना पुन्हा देण्यात यावे. या प्रकरणी वादाचे सर्वच मुद्दे टाळले जावेत असेही कोर्टाने या प्रकरणी म्हटल्याचे या वकिलांनी सांगितले.
निवडणुका महायुती एकत्र लढेल : मुख्यमंत्री
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महयुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.