मुंबई : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही का? की भाजपाकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाणार, याबाबतचे सर्व तर्क-वितर्क अखेर आज संपुष्टात आले. शिवसेनेचा दहावा चेहरा किंवा मतांचा ‘घोडेबाजार’ या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

नऊ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दाखल केले अर्ज
मुंबई : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही का? की भाजपाकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाणार, याबाबतचे सर्व तर्क-वितर्क अखेर आज संपुष्टात आले. शिवसेनेचा दहावा चेहरा किंवा मतांचा ‘घोडेबाजार’ या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीकडून आठ आणि महाविकास आघाडीकडून एक असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात उतरले. अतिरिक्त उमेदवारी न आल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपनाने आपली पाच उमेदवारांची यादी दोन दिवसांपूर्वीच जाहीर करून आघाडी घेतली होती. मात्र, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली. अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असताना, दुपारी एकच्या सुमारास नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी नीलम गोऱ्हे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा टाळतच हालचाली सुरू ठेवण्यात आल्या होत्या. अखेर झिशान सिद्दीकी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुनेत्रा पवारांसह पक्षाचे वरिष्ठ नेते विधानभवनात दाखल झाले. त्यानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले.
दानवे यांचा अर्ज दाखल
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते नाराज होते. त्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना (उबाठा) नेते काँग्रेस कार्यालयात पोहोचले. त्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसचा विरोध मावळला. दुपारी अडीच वाजता अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह अर्ज दाखल केला.
शिंदेसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंना विधानपरिषदेची लॉटरी
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरूवारी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यादरम्यान शिंदे गटात प्रवेश करताच बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. आपण पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्याचे यावेळी बच्चू कडू म्हणाले. शिवसेनेचा धनुष्यबाण मी हाती घेत आहे. काल-परवा याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत, असेही ते म्हणाले.
हे आहेत उमेदवार…
प्रमोद जठार
माधवी नाईक
विवेक कोल्हे
सुनील कर्जतकर
संजय भेंडे
प्रज्ञा सातव
झिशान सिद्दीकी
बच्चू कडू
नीलम गोऱ्हे


