मंगरूळपीर : कोरड्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. ३०) शेलूबाजारजवळील वनोजा येथे समृद्धी महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विदर्भातील चार आमदारांसह पश्चिम विदर्भातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

वनोजा इंटरचेजवर पोलीस-आंदोलकांमध्ये जोरदार झटापट; आमदार नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात
मंगरूळपीर : कोरड्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. ३०) शेलूबाजारजवळील वनोजा येथे समृद्धी महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विदर्भातील चार आमदारांसह पश्चिम विदर्भातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. अखेर आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भातील शिवसेना ठाकरे गटाच्या चार आमदारांनी एकत्रित सहभाग नोंदविला. यामध्ये बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, दर्यापूरचे आमदार गजानन मोतीराम लवटे आणि वणीचे आमदार संजय निळकंठराव देरकर यांचा समावेश होता. याशिवाय शिवसेना नेत्या जयश्री शेळके, डॉ. सिद्धार्थ देवळे, वाशिम जिल्हाप्रमुख बाळाजी वानखेडे, राजेश पाटील राऊत, अनिल पाटील राऊत, मंगरूळपीर तालुकाप्रमुख अर्जुन भीमराव सुर्वे, शिवा सावके, सचिन परळीकर, विलास लांभाडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पश्चिम विदर्भातील शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

पाच हजारांची मदत तुटपुंजी
यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने वाशिमसह पश्चिम विदर्भातील अनेक भागांत खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन, कपाशी, तूर यासह विविध पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके दाणे भरण्यापूर्वीच वाळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पादन आले नाही. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामाच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नुकसानीच्या तुलनेत ही मदत अपुरी असून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देणे आवश्यक असल्याची भूमिका आमदार नितीन देशमुख यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी मांडली. पीकविमा भरपाई आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.
—
परवानगी नाकारूनही महामार्गावर आंदोलन
समृद्धी महामार्गावर रास्ता रोको केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तसेच संभाव्य आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महामार्ग रोखण्याच्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम होते. शुक्रवारी सकाळपासून शेलूबाजार-वनोजा परिसरात पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी आणि शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर धडक देत वाहतूक रोखली.
—
आंदोलकांसह पोलिसांसाठीही जेवणाची व्यवस्था
आंदोलनात सहभागी होण्यासाठी पश्चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी आणि कार्यकर्ते आले होते. त्यांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने बेसन-चपातीच्या जेवणासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
—
दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली होती. वनोजा परिसरासह समृद्धी महामार्गावर सुमारे दीड हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेजारील जिल्ह्यांतूनही पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. मोठ्या पोलीस बंदोबस्तानंतरही आंदोलनाला संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले.


