वाशिम : बस व रेल्वे प्रवासात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल, बॅग व रोख रक्कम चोरणाऱ्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या असून या कारवाईत सुमारे २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाशिम : बस व रेल्वे प्रवासात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल, बॅग व रोख रक्कम चोरणाऱ्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या असून या कारवाईत सुमारे २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांविरोधात सातत्याने धडक मोहिमा राबवण्यात येत असून खिसेकापू व चोरी करणाऱ्या आरोपींवर प्रभावी कारवाई सुरू आहे.
९ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी रामदास तुकाराम सर्जेराव (रा. पिंपळशेंडा, ता. मालेगाव) हे बसने वाशिमकडे येत असताना अकोला नाका परिसरात त्यांच्या खिशातून अज्ञात चोरट्याने २८ हजार ६०० रुपयांची रक्कम चोरी केली होती. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवण्यात आली; मात्र तो वारंवार ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना चकवा देत होता.
दरम्यान, १ मे रोजी आरोपी पुन्हा चोरीच्या उद्देशाने वाशिममध्ये आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला नाका परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजकुमार उर्फ साधू कडू डोडे (वय ३३, रा. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे असून चौकशीत त्याने वाशिममधील चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून रोख ९ हजार ५०० रुपये, विविध कंपन्यांचे १३ मोबाईल (अंदाजे १ लाख ९५ हजार रुपये), ३ ग्रॅम सोने व १६ तोळे चांदी (अंदाजे ९५ हजार रुपये) असा एकूण २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपीने नांदेड, भुसावळ व वाशिम येथेही मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपीस वाशिम शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी तसेच पोउपनि नीलेश जाधव व त्यांच्या पथकाने पार पाडली असून त्यांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


