बुलढाणा: अलीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. संतोष देशमुख हत्याकांड, स्वारगेट बस स्थानक परिसरातील दुष्कृत्य, यासह विविध घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे स्पष्ट होते. एका दिवसापूर्वीच नागपूर येथे झालेली दंगल, याचे ताजे उदाहरण आहे. आतापर्यंत राज्यातील २ हजार ४०० पोलिसांवर हल्ले झाल्याचा आरोप करीत कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा दावा माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

अनिल देशमुख हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, जिल्हा मुख्यालयातील विश्रामगृहात आज सकाळी माध्यमांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता मात्र, कर्जमाफी विषयी कोणीही बोलत नाही. प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी १ लाख ७३ हजार कोटींची उलाढाल केली जाते. मात्र त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार कोटी लागत असतानाही सरकारकडून शेतकरी हिताचा निर्णय घेतल्या जात नाही. निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेचा कांगावा केला. २ हजार १०० इतके अनुदान देणार असल्याचे सांगून, प्रत्यक्षात तसे झाले नाही. निकषाच्या नावाखाली कितीतरी लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडण्यात आलं. दुसरीकडे, कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात सरकार अपयशी ठरले असून, दररोज हिंसाचाराच्या घटना समोर येत आहे. राज्यासाठी हे अत्यंत धोकादायक ठरले असून, याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही देशमुख म्हणाले. पत्रकार परिषदेत देशमुख यांच्यासह सिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, रेखा खेडेकर यांसह महाविकास आघाडीतील अन्य पदाधिकारी हजर होते.