Rajkumar Wagh : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुंभारी गावचा राजकुमार वाघ हा युवा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

साध्या गावातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत प्रवास; मेरी कोम यांच्या उपस्थितीत होणार स्पर्धा
विनोद काळे | जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुंभारी गावचा राजकुमार वाघ हा युवा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. २६ एप्रिल रोजी नवी मुंबईतील सीवूड्स येथे होणाऱ्या ‘एशियन प्रो प्रीमियर बॉक्सिंग चॅम्पियनशिप’च्या तिसऱ्या पर्वात तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

‘इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन’तर्फे आयोजित या स्पर्धेचा उद्देश भारतातील व्यावसायिक बॉक्सिंगला चालना देणे आणि नवोदित तसेच अनुभवी खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
राजकुमार वाघ याचा प्रवास विशेष प्रेरणादायी आहे. बॉक्सिंगपूर्वी त्याने ‘कुडो’ या जपानी मार्शल आर्ट प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवली आहेत. २०२४ मध्ये बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या अडचणींवर मात करत त्याने ही मोठी संधी मिळवली आहे.
राज्याचे प्रतिनिधित्व हा अभिमानाचा क्षण
या स्पर्धेत भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, विविध क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटींचीही उपस्थिती अपेक्षित आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे वाघ यांनी सांगितले.


