Jalna Crime News : शासनाच्या गायगोठा बांधकामासाठीच्या मंजूर झालेल्या अनुदानाचा हप्ता देण्यासाठी कंत्राटी अभियंत्याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कंत्राटी अभियंत्यास रंगेहात अटक केली.
मंठा (जि.जालना) : शासनाच्या गायगोठा बांधकामासाठीच्या मंजूर झालेल्या अनुदानाचा हप्ता देण्यासाठी कंत्राटी अभियंत्याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कंत्राटी अभियंत्यास रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवार 22 मे रोजी मंठा पंचायत समितीमध्ये करण्यात आली.
मंठा पंचायत समितीमध्ये कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या महेश अंकुशराव बोराडे (36, रा.मंठा फाटा) याने तक्रारदारास शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गंत गाय गोठा बांधकासाठी 77 हजार रुपये अनुदान मंजूर झालेले असून, पहिला हप्ता नऊ हजार रुपये त्यांना मश्टरद्वारे प्राप्त झाला आहे. दुसऱ्या हप्त्याचे नऊ हजार 447 रुपये त्यांना देण्यासाठी आरोपी महेश बोराडे यांने तक्रारदाराकडे सात हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदाराने ती लाच न देता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीवरुन 12 फेब्रुवारी 2024 ते 21 मार्च 2024 आणि 22 मार्च 2024 रोजी आरोपीच्या लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली असता आरोपीने तक्रारदारांचे गाय गोठा बांधकामाचे अनुदानातील रक्कमेपैकी दुसरा हप्ता तक्रारदार यांना देण्यासाठी पंचासमक्ष सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपी बोराडे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध मंठा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.