जालना : मुंबई येथील वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाई आणि सुपारी फेकून मनसे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ही घटना शनिवार, 9 मे रोजी जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुलीवर घडली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

ॲड. सदावर्ते हे शनिवारी जालना दौऱ्यावर आले होते. जालन्यातून ते मानदेऊळगावकडे रवाना होत असताना छत्रपती संभाजीनगर चौफुलीजवळ आधीपासून दबा धरून बसलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, राजसाहेब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं”, गुणरत्न सदावर्ते हाय हाय, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या वाहनावर शाई आणि सुपारी फेकत तीव्र निषेध नोंदविला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेला सदावर्ते यांनी विरोध दर्शवल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते आधीपासूनच सदावर्ते यांच्यावर नाराज होते. या पार्श्वभूमीवरच हे आंदोलन छेडण्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वीच मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी सदावर्ते जालन्यात आल्यास त्यांच्या गाडीवर शाई फेकण्यात येईल, असा इशारा दिला होता. शनिवारी त्याच पद्धतीने हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. या
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कारवाई करत मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
या आंदोलनात महेश नागवे, अनिल हिवाळे, विलास तिकाडे, मिनी शाहीवाले यांच्यासह अनेक मनसैनिक सहभागी झाले होते.