वाशिम: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवारी जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.

वाशिम: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवारी जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत एका दिवसात तब्बल ४३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून ३ कोटी ८६ लाख ९६ हजार ५१८ रुपयांच्या प्रकरणांवर तडजोडीने तोडगा काढण्यात आला.
लोक अदालतीचे उद्घाटन उपस्थित पक्षकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यन, जिल्हा न्यायाधीश-१ जे. पी. झपाटे तसेच जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अनुप बाकलीवाल उपस्थित होते.

राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली ३ हजार ६०३ प्रकरणे तसेच दाखलपूर्व ३ हजार ९०२ प्रकरणे विचारार्थ ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४२६ प्रलंबित प्रकरणे आणि ६ दाखलपूर्व प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला.
वाद न्यायालयाबाहेर सामोपचाराने मिटविण्याच्या दृष्टीने लोक अदालतीची संकल्पना प्रभावी ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेषतः दिवाणी, मोटार अपघात, बँक वसुली, कौटुंबिक व तडजोडीयोग्य प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडगे निघाल्याने पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचला.


