” मी कोणाला भेटावं, आणि कोणाला नाही. हे सांगणारे तुम्ही कोण ” असा सवाल करीत शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी विद्यार्थी आंदोलनाचे नेते अभिजित दिपके यांनी वाळूज पोलिस ठाण्याच्या एका पोलिस उपनिरिक्षकाला चांगलेच झापले. ” माझ्या घराच्या परिसरातून बाहेर व्हा ” असे म्हणत त्यांनी या उपनिरिक्षकाला बाहेर काढले. दुसरीकडे पोलिस प्रशासनाकडून अभिजित दिपके यांच्यावर करडी नजर ठेवली जात आहे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून कोण भेटायला येते यांची नोंद करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोज जनता पाटचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. त्यांनी लोकांना भेटू नये यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी वाळूज पोलिस ठाण्यातील एक पोलिस उपनिरिक्षक असा प्रयत्न करीत असतांना दिपके आणि पोलिसांमध्ये शाब्दीक वाद झाला. यावेळी अभिजित दिपके यांनी या पोलिस उपनिरिक्षकाला त्यांच्या घराच्या परिसरातून बाहेर काढले.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे नेते आणि कॉक्रोज जनता पाटचे संस्थापक अभिजित दिपक छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरात राहतात. या परिसरासाठी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे येते. दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर याच ठिकाणी बैठक घेतली, पुढील सर्व नियोजन आता छत्रपती संभाजीनगर येथून ठरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या राहत्या घरावर आणि दिपके यांच्या हालचारीवर पोलिस करडी नजर ठेवत आहेत. दिपके यांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. शुक्रवारी या गाठीभेटी सुरू असतांना साध्या कपड्यातील एका पोलिस उपनिरिक्षकाने लोकांना भेटण्यास मज्जाव केला. यावेळी दिपके यांनी त्यांना चागलेच धारेवर धरत ” मी कोणाला भेटायचे हे सांगणारे तुम्ही कोण ” ? असा जाब विचारला. ” माझ्या घराच्या परिसरातून बाहेर व्हा… असे सुनावत सबंधीत पोलिस उपनिरिक्षकाला बाहेर काढले.
राजकारण्यांच्या भेटीने वाद…
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिपके यांचे महत्व वाढले आहे. त्यांना भेटण्यासाठी राजकारणी सुध्दा त्यांच्या घरी जात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी प्रथम त्यांची भेट घेतली. त्यानंतर आ. बच्चु कडू यांनी सुध्दा भेट घेवून चर्चा केली. हे दोन्ही नेते शिवसेना शिंदे गटाचे असल्याने भाजपाकडून शिंदेसेनेवर टिका केली होती. त्यानंतर ” एक आंदोलक म्हणून आपण भेट घेतली ” असा खुलासा आ. कडू यांनी केला. शिंदे सेनेचे लोक भेटून अभिजित यांची पाठराखण करीत असल्याने शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी सुध्दा दिपके यांची भेट घेतली होती.
उध्दव सेना, राष्ट्रवादीला श्रेय
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत अभिजित दिपके यांनी ” शिवसेना उबाठाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझी वारंवार विचारपूस केली, मुलाप्रमाणे प्रेम दिले ” असे सांगितले होते. त्यामुळे राज्यात उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला दिपके यांनी श्रेय दिल्याची चर्चा रंगली. त्यात दिल्ली येथील आंदोलनादरम्यान दिपके राष्ट्रवादीच्या एका युवा नेत्याच्या घरी मुक्कामी राहत असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षाला दिपके यांचे एक प्रकारे समर्थन असल्याचीही चर्चा होती. या सर्व प्रकारावर पडदा पडावा म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील काही मंत्री दिपके यांच्याशी नाते सांगून श्रेय लागण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू आहे.