जाफ्राबाद : शासनाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेली शेती अवजारे वारंवार नादुरुस्त होत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार नादुरुस्त होणारी शेतीची औजारे कंपनीचा डीलर देखील दुरुस्त करुन देत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी अकोट येथील थोरात ॲग्रो या कंपनीवर कारवाई करीत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जाफ्राबाद तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी अक्षय शिवाजी फदाट यांनी थोरात ऍग्रो लिमिटेड, अकोट या कंपनीकडून हायड्रोलिक नांगर खरेदी केला होता. मात्र, खरेदी केलेल्या अवजारामध्ये सुरुवातीपासूनच तांत्रिक बिघाड (कंपनी फॉल्ट) असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी जाफ्राबाद येथील लोकमान्य एजन्सी या अधिकृत डीलरकडे संपर्क साधला. मात्र, अनेक वेळा चकरा मारूनही त्यांना कोणतीही दुरुस्ती किंवा बदल करून देण्यात आले नाही. उलट, संबंधित यंत्रावर कोणतीही वारंटी लागू नसल्याचे सांगण्यात आले, असा आरोप अक्षयद फदाट यांनी केला आहे. दरम्यान, महाडीबीटी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे व योजनांसाठी अनुदान देणारी योजना असून, या योजनेचा लाभ शेतकरी घेत असून त्यांना नित्कृष्ट दर्जाची औजारे मिळत असल्याने अक्षय फदाट यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाडीबीटी अंतर्गत अकोट येथील थोरात ऍग्रो कंपनी यांच्याकडून बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीचे अवजारे खरेदी केले आहेत. किती शेतकऱ्यांच्या अवजारामध्ये तांत्रिक बिघाड आहे याची चौकशी करून, तसेच अक्षय फदाट यांच्या ट्रॅक्टर नांगरमध्ये काय तांत्रिक बिघाड आहे याची सुद्धा चौकशी करण्यात येईल अशी माहिती जाफ्राबाद येथील कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी दिली आहे. तसेच यंत्रात बिघाड आढळल्यास संबंधित थोरात कंपनीवर कारवाई केल्या जाईल असे त्यांनी सांगितले.