बुलढाणा : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सादर केला होता. आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे.

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सादर केला होता. आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे. तसेच विजय वडेट्टीवारांची काँग्रेस विधानसभा विधी मंडळ पक्षनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करताना ज्या नेत्याच्या संस्था नाहीत, अशा व्यक्तीची आणि आक्रमक चेहऱ्याची निवड करावी, असा राहुल गांधी यांचा आग्रह होता. त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी या आधी बुलढाणा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विधिमंडळ पातळीवर सुद्धा अभ्यासू आणि आक्रमक म्हणून परिचित आहेत.
जिल्हा परिषदेचे सदस्य ते आमदार
एनएसयुआय, युवक काँग्रेसच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ विद्यार्थी, युवक चळवळीत सक्रीय होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांच्या माध्यमातून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले. त्यानंतर वऱ्हाडासह संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसच्या मजबूत बांधणीत सपकाळ यांची भुमिका महत्वपूर्ण राहिली. त्यामुळे राहुल गांधी ब्रिगेडमध्ये महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव आणि हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली होती. जिल्हा परिषदेचे सदस्य, अध्यक्ष, आमदार, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव ते पक्षाचे अखिल भारतीय पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ‘गुड बुक’ मध्ये सपकाळ असल्याचे मानले जाते