Gold was grown from garlic : लसूण शेतीतून सोनं पिकवून शेतकऱ्याच्या मेहनतीला लाखोंचं मोल आल्याचे उदाहरण बुलढाणा तालुक्यातील हतेडी बु. येथे बघावयास मिळते. शेतकरी पत्नी निशा आणि पती विलास शेळके यांनी आपल्या शेतात मेहनत, जिद्द आणि नवे तंत्र वापरून कृषी क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. फक्त एक एकर शेतातून लसणाचे उत्कृष्ट उत्पादन घेत, त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
विनोद सावळे/ बुलढाणा : लसूण शेतीतून सोनं पिकवून शेतकऱ्याच्या मेहनतीला लाखोंचं मोल आल्याचे उदाहरण बुलढाणा तालुक्यातील हतेडी बु. येथे बघावयास मिळते. शेतकरी पत्नी निशा आणि पती विलास शेळके यांनी आपल्या शेतात मेहनत, जिद्द आणि नवे तंत्र वापरून कृषी क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. फक्त एक एकर शेतातून लसणाचे उत्कृष्ट उत्पादन घेत, त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले असून, त्यांचे परिश्रम इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
बुलढाणा तालुक्यातील हतेडी बु. येथील शेतकरी कांताबाई व मुधकरराव शेळके या दांपत्याने सहा एकर शेतीत काबाडकष्ट करून मुलांना उच्चशिक्षित बनविले. त्यांचा मोठा मुलगा भास्कर शेळके व पत्नी स्वाती शेळके दोघेही कृषी सहायक म्हणून नोकरी करतात. कैलास शेळके बीएससी बायोटेक तर पत्नी शितल बीएससीअग्री झालेले आहे. मुलगा विलास व पत्नी निशा शेळके यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, ते शेतीचा कारभार सांभाळतात. त्यांना याकामी संपूर्ण परिवाराची साथ लाभत असल्याने पत्नी निशा व विलास शेळके हे शेतीत नवनवे तंत्रज्ञान वापरून शेतीत विविध प्रयोग राबवितात. शेतीमातीशी घट्ट नाळ जुळलेल्या या शेळके परिवाराने मोठा मुलगा भास्कर शेळके यांच्या मार्गदर्शनात 2022 मध्ये अर्ध्या एकर क्षेत्रावर लसणाची लागवड केली. यासाठी त्यांना बियाणे आणण्यापासून ते लसूण निघेपर्यंत 50 हजार रुपये खर्च आला. अर्ध्या एकरात 20 क्विंटल लसणाचे उत्पन्न झाले. तीन ते साडेतीन हजार लसणाला दर मिळाल्याने 70 हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले. दुसऱ्या वर्षी एक एकर शेतात लसण लागवड केली. त्यावर्षी 40 क्विंटल असे 6 लाखाचे उत्पन्न झाले. यंदा तीन एकर शेतात लसूण लागवड केली असून, लसणाचे बियाणे आणण्यापासून ते आतापर्यंत तीन लाखाचा खर्च झाला. तीन एकरातून जवळपास 120 क्विंटल लसणाचे उत्पन्न अपेक्षित असून सध्याचे लसणाचे बाजार भाव पाहता भरघोस उत्पन्न होण्याची अशा त्यांना आहे.
असे वाढले उत्पन्न
पहिल्या वर्षी अर्धा एकर लसणाची लागवड केली. त्यातून खर्च वजा जाता 20 हजाराचे उत्पन्न मिळाले, दुसऱ्या वर्षी एक एकर लागवड केली. त्यासाठी 80 हजार खर्च झाला, तर 5 ते 6 लाखाचे उत्पन्न मिळाले. लसण लागवडीतून मिळणारे उत्पन्न पाहता यंदा तीन एकर लागवड केली आहे.
आंतरपिकातून 20 हजारांचे उत्पन्न
तीन एकरात लसणाची लागवड केली. त्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर घेतले होते. त्यामाध्यमातून 20 हजारांचे उत्पन्न मिळाले. याव्यतिरिक्त 10 गुंठे कोथिंबीरमधून एक लाखाचे उत्पन्न मिळाले.
यावर्षी तीन एकरावर लसणाची लागवड करण्याचे नियोजन केले. दोन महिन्याअगोदर शेतात लसणाची लागवड केली. लागवडी करिता बियाणे आणण्यापासून ते आतापर्यंत तीन ते साडे तीन लाख खर्च झाला आहे. तीन एकरात 120 क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा असून, सध्याचा बाजार भाव कायम राहिल्यास भरघोस उत्पन्न मिळेल.
-विलास शेळके, शेतकरी हतेडी बु.