Fatal accident in Ambad : एका उभ्या ट्रकला भरधाव हुंडाई कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कारमधील चारजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवार, १ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालूक्यातील महाकाळा पाटीजवळ घडली.
जालना / अंबड : एका उभ्या ट्रकला भरधाव हुंडाई कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कारमधील चारजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवार, १ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंबड तालूक्यातील महाकाळा पाटीजवळ घडली.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजता ट्रक ( के.ए.३२.डी.९२८३ ) च्या चालकाने सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा पाटीजवळ साइड पंख्याला स्वयंपाक करण्यासाठी उभा केला होता. दरम्यान, हुंडाई ( एम.एच.२०.सीएस. ६०४१ ) कारने उड्डाण पूलावरुन भरधाव वेगाने येत उभ्या ट्रकच्या उजव्या बाजूला जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमध्ये सहा प्रवाशी होते. या अपघातात अनिता परसराम कुटे ( वय ४८ ),भागवत यशवंत चौरे ( वय ४७ ),सृष्टी भागवत चौरे ( वय १३ ), वेदांत भागवत चौरे ( वय ११ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर परसराम लक्ष्मण कुटे ( चालक रा. छत्रपती संभाजीनगर ), छाया भागवत चौरे ( वय ४० रा. जालना अंबड रोड) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच जवळपासच्या नागरिकांनी मदतकार्य करत पोलीसांना माहिती दिली.
यावेळी शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक इब्राहिम शेख, असलम बागवान, सुशील करांडे, केंद्रे आदी पोलीस कर्मचारी मदतीला धावून येत, मृतदेह बाहेर काढून जखमींना शहागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर मदतकार्य करणारी आयआरबी कंपनीची व्हॅन मदतीला आली होती. महाकाळा पाटी ते शहागड चार किमीच्या अंतरातील हा आठवडाभरातील दुसरा अपघात आहे.
चर खोदून ठेवल्यामुळे साईडला जागा नाही
सोलापूर – धूळे राष्ट्रीय महामार्गाची २० वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या खासगी कंपनी आयआरबीने राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडमध्ये चर खोदून ठेवले आहेत. ज्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर साइडला वाहन उभे करण्या इतपत जागा नाही. ज्यामुळे वाहन अर्धे राष्ट्रीय महामार्गावर राहते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण दिले जात आहे.