Naxal attack in Chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सुरक्षा दलाचे वाहन भूसुरुंग स्फोट करून उडवले, त्यात नऊ जवान शहीद झाले आहेत. तसेच सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत.
बिजापूर: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सुरक्षा दलाचे वाहन भूसुरुंग स्फोट करून उडवले, त्यात नऊ जवान शहीद झाले आहेत. तसेच सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील कुत्रू पोलिस स्टेशन हद्दीतील अंबेली गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट केला आणि सुरक्षा दलांचे वाहन उडवले. या घटनेत दंतेवाडा जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे आठ जवान शहीद झाले आणि वाहन चालकाचाही मृत्यू झाला. दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्यांतील एक संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानासाठी पाठवण्यात आले होते. हे पथक सोमवारी ऑपरेशनवरून परतत असताना, दुपारी 2.15 च्या सुमारास, नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट केला आणि सुरक्षा दलाचे वाहन उडवले. या हल्ल्यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली जात आहे. यापूर्वी, २६ एप्रिल २०२३ रोजी, शेजारच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्याचा भाग असलेल्या ‘मल्टी युटिलिटी व्हेईकल’ (एमयूव्ही) वर बॉम्बस्फोट केला होता. या घटनेत 10 पोलीस कर्मचारी आणि एका चालकाचा मृत्यू झाला होता.