नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी शिवमंदिराजवळ एक इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली. या इमारतीत वसतिगृह चालत होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते, अपघातावेळी विद्यार्थी खोल्यांमध्ये होते आणि तळघरात खोदकाम सुरू होते. सात जणांना वाचवण्यात आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली किती मुले अडकली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका तरुणाने आपला व्हिडिओ बनवून शेअर केला. त्याने लोकांना मदतीची (बचावाची) विनंती केली. स्थानिक लोक हातोड्याने ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ढिगाऱ्याखाली काही गाड्याही दबल्या आहेत. अहवालानुसार, ढिगाऱ्याशेजारी आणखी एक इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. पण लोकांना तिथून बाहेर काढण्यात आले आहे.
मदत पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सत्य निकेतनमध्ये इमारत कोसळल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, डीडीएमए, एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन दल, दिल्ली पोलीस, एमसीडी, कॅट्स आणि नागरी संरक्षण दलाची पथके युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, जवळच्या इमारतीदेखील रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना तत्काळ मदत पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

