जालना : मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना जालना शहराजवळील निधोना ( ता. जालना ) रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथे घडली.

जालना : मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना जालना शहराजवळील निधोना ( ता. जालना ) रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध पोक्सो,ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना रेसिडेन्सी येथील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणांना विरोध केला म्हणून मुलीच्या वडिलांना दोघांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून
जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यातील आरोपी यांचे कुटुंबीय आणि पीडित मुलीचे कुटुंबीय हे शेजारी शेजारी राहतात. दरम्यान, यांच्यात वाद असून याबाबत यापूर्वी एक एनसी दाखल आहे. दरम्यान, माझ्या मुलीची छेडछाड का करतो, असे आरोपींना विचारले म्हणून दोघांनी मुलीच्या वडिलांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून सचिन पठाडे, गणेश पठाडे, राजू ( पूर्ण नाव माहिती नाही ), दत्ता ( सचिन याचा भाचा ), सचिनची बहीण, मेव्हणा, अनिता पठाडे, सचिनची मावशी, मावस बहीण, अंकुश पठाडे या नऊ जणांविरुद्ध पोक्सो, ॲट्रॉसिटीसह , जीवे मारण्याचा प्रयत्न व इतर कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी हे करीत असल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा
अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणांनी अशा पद्धतीने वडिलांना मारहाण करणे, ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय घटना आहे. मी अधिवेशनात आहे. मात्र याबाबत तत्काळ पोलिस अधीक्षकांना बोलून गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची सूचना देणार आहे.
– अर्जुन खोतकर, आमदार, जालना