छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी एका भरधाव कारने पाच जणांना उडवले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी एका भरधाव कारने पाच जणांना उडवले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत एकनाथ मगर (वय ३०, रा. सिडको) हा गारखेडा येथील क्रीडा संकुलातून टेनिस खेळून आपल्या MH-20-HH-0746 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने घरी जात होता. दरम्यान, काळा गणपती मंदिराजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुसऱ्या मुळे तो गोंधळला आणि टर्न घेताना त्याच्या गाडीचा वेग वाढला. परिणामी त्याची गाडी मंदिरासमोर उभ्या असल्या पाच जणांना उडवून पुढे गेली. या अपघातात काळा गणपती मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय ७०) हे गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. तर, मनीषा विकास समधाने (वय ४०) व विकास समधाने (वय ५०) या दाम्पत्यास एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय रवींद्र भगवंतराव चौबे (वय ६५) आणि श्रीकांत प्रभाकर राडेकर (वय ६०) या दोघांवर मिनी घाटीत उपचार सुरू केले. त्यानंतर त्यांच्या नाते वाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात हालवले.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरात वाहतूक नियंत्रण, गतिरोधक आणि बंदोबस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.