छत्रपती संभाजीनगर : वाळूजजवळील मुरमी गावात शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी रात्री एका 17 वर्षीय मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 24 तासाच्या आत मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या.

छत्रपती संभाजीनगर : वाळूजजवळील मुरमी गावात शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी रात्री एका 17 वर्षीय मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 24 तासाच्या आत मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या. पैशाच्या वादातून त्याने मैत्रिणीचा गळा चिरल्याची कबूली पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब मोरे, रा. मुरमी असे आरोपीचे नाव आहे. तर वैष्णवी संतोष निळ (17 वर्ष), रा. मुरमी असे मयत मुलीचे नाव आहे. मयत वैष्णवी ही वाळूज परिसरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. शुक्रवारी वैष्णवीचे आई-वडील शेतात गेले होते, ते सायंकाळी उशीरा घरी परतले त्यावेळी वैष्णवी घरात मृत अवस्थेत आढळून आली. तसेच तिच्या गळ्यावर जखम आढळून आल्याने तीने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, छावणी विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.भागीरथी पवार, वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, पोलिस अंमलदार अमोल गायकवाड, पांडूरंग शेळके, मल्हार गरगडे, संदीप धनेधर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच पोलिसांनी फॉरेंन्सीक पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान घराजवळच घुटमळले.
दरम्यान, पोलिसांनी मयत वैष्णवीच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यास सुरुवात केली असता, मुरमी परिसरात राहणाऱ्या नानासाहेब मोरे याच्यासोबत तिची अनेक दिवसांपासून मैत्री असल्याचे तसेच नानासाहेब तिच्या घरी येत, जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच घटनेच्या दिवशी नानासाहेब याच्यासोबत वैष्णवीचा वाद झाल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नानासाहेब मोरे याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने वैष्णवीचा पैशाच्या वादातून गळा चिरला असल्याची कबूली दिली. याप्रकरणी नानासाहेब मोरे याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे करीत आहेत.
