मलकापूर : शेतकरी आणि सैनिक आहेत म्हणून हा देश जिवंत आहे. मात्र, आज देशाचा जवान आणि जगाचा पोशिंदा शेतकरी दोघेही आतल्या आत गुदमरत आहेत. दुष्काळ येणार हे सरकारला वर्षभर आधी माहीत होते, मग शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर का आणून ठेवले ? सरकार हातावर हात ठेवून बसलं आहे. आता घरात बसून न्याय मिळणार नाही. रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्ही फक्त साथ द्या, सरकारच्या नरडीवर पाय देऊन तुम्हाला मदत मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही. कशी मदत मिळत नाही तेच पाहतो, अशा आक्रमक शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी मलकापूरच्या भूमीतून सरकारविरोधात संघर्षाचा शंखनाद केला.

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या न्याय्य हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बहुचर्चित ‘दुष्काळ संघर्ष यात्रे’ला शनिवारी मलकापूर येथून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दणक्यात सुरुवात झाली. पुलवामा हल्ल्यातील शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर वीरपत्नी सुषमाताई राजपूत यांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखवली. ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी मलकापूर दुमदुमले. विशेष म्हणजे, ४ डिसेंबरला बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चाची घोषणा करतानाच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर सरकारला शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा तुपकरांनी दिला. त्यामुळे या संघर्ष यात्रेकडे राज्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.प्रारंभी झालेल्या सभेनंतर सभास्थळापासून तहसील कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकालाही अभिवादन करण्यात आले.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर तुपकरांनी जोरदार हल्लाबोल केला. पाच हजार रुपयांत दिवाळी होते का? शेतकऱ्याच्या सोयाबीनला एकरी एक लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्याच्या हातात काय उरलं? संसार कसा चालवायचा? मुलांचं शिक्षण कसं करायचं? कर्ज कसं फेडायचं? सरकारने जाहीर केलेली पाच हजारांची मदत आम्हाला मान्य नाही. आम्हाला हेक्टरी एक लाख रुपयांची मदत हवी आहे. त्यासाठी हेक्टरची कोणतीही मर्यादा नको. शेतमजूर आणि भूमिहीनांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. कार्यक्रमाला वीरपत्नी सुषमा राजपूत, त्यांचे पुत्र जय व शुभम राजपूत, ॲड. हरीश रावळ, ॲड. प्रवीण सुरडकर, जालना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती डॉ. अप्पासाहेब कदम, बालू शर्मा, ईश्वर पाटील, भगवानराव मोरे, गजानन भोपळे, राजीव कसबे, ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत, सचिन शिंगोटे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, माजी सैनिक आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोयाबीनला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये भाव द्या
सोयाबीन आणि कापसाच्या दरावरूनही तुपकरांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “केंद्र सरकार सोयापेंड आयात करण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय घेऊ नका. आयात करण्याऐवजी निर्यातीला प्रोत्साहन द्या. सोयाबीनला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये भाव द्या. कापसावरील आयात शुल्क शून्य केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ते आयात शुल्क ३० टक्के करा. कापसाला प्रतिक्विंटल १७ हजार रुपये भाव द्या,” अशा मागण्या त्यांनी केल्या.
शेतकऱ्यांनाही २४ तास वीज द्या
पुण्या-मुंबईत २४ तास वीज देता, मग ग्रामीण भागात काय जनावरं राहतात का? शेतकऱ्यांनाही २४ तास वीज मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीकविम्याचा प्रश्न मार्गी लावावा, महिला बचतगटांचे कर्ज माफ करावे आणि दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या.