dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रानडुकराच्या धडकेत ऑटो पलटी; एकाच कुटुंबातील तिघे  गंभीर जखमी

कारंजा  :तालुक्यातील शिवण गावातील एक कुटुंब रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. 

कारंजा  :तालुक्यातील शिवण गावातील एक कुटुंब रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद आनंदराव ढोरे, त्यांची पत्नी जिजाबाई प्रमोद ढोरे व मुलगी साक्षी प्रमोद ढोरे हे कामानिमित्त धनज येथील पोलिस ठाण्यात गेले होते. काम आटोपून परत येत असताना लाडेगाव रोडवर अचानक ऑटोच्या समोर रानडुक्कर आडवे आले. त्यामुळे ऑटोचालकाचे नियंत्रण सुटून ऑटो पलटी झाला.

या अपघातात ऑटोमधील तिन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर कामरगाव पोलिस चौकीतील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामरगाव परिसरातील नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी धनज पोलिस ठाण्यात जावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामरगाव पोलिस चौकीत दिवसा एक व रात्री एकच कर्मचारी कार्यरत असल्याचे वास्तव आहे. एखादा वाद, गुन्हा किंवा आपत्कालीन घटना घडल्यास केवळ एकाच पोलिस कर्मचाऱ्याने परिस्थिती कशी हाताळावी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

कामरगाव चौकीअंतर्गत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होत असतानाही अवघ्या एक-दोन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चौकीचा कारभार चालविला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तातडीने कामरगाव पोलिस चौकीला पुरेसे पोलिस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी कामरगाव परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top