अकोला : मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर/बीएलओ) अंतर्गत शिक्षकांची नियुक्ती करताना निश्चित, पारदर्शक आणि न्याय्य धोरण अवलंबण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षक भारती संघटना, अकोला जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर करण्यात आले.

शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अध्यापनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या
अकोला : मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर/बीएलओ) अंतर्गत शिक्षकांची नियुक्ती करताना निश्चित, पारदर्शक आणि न्याय्य धोरण अवलंबण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षक भारती संघटना, अकोला जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेने निवेदनात नमूद केले की, सध्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र अनेक वेळा एकाच शिक्षकांवर वारंवार जबाबदाऱ्या सोपविल्या जात असल्याने त्यांच्या नियमित शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. यामुळे शिक्षकांमध्ये असमानतेची भावना निर्माण होत असून सर्व शिक्षकांना समान संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून शिक्षकांच्या विविध समस्या व भावना प्रशासनापुढे मांडल्या. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सन्मानासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यातही शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक व लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष मनोज देशमुख, प्रेमेद्र जंजाळे, विजय वाळसे, सुनील आठवले, निलेश भाकरे, सुरेश तायडे, प्रिया सुळोकार, सौरभ म्हात्रे, शशिरेखा पारिका, पायल श्रावगी, अलका मुंढे, किरण राठोड, जयश्री नवलकार, शैलेश देशमुख, प्रकाश नवलकार, अर्चना रंजनकर, आनंद वाघमारे, मृणाल महाजन, अनुजा सराफ, विजया मोडक, कांचन राठी, माणिक रानडे, प्रशांत घुगे, दिप्ती सावजी, विनोद सावजी आणि रामकृष्ण नागमोते यांच्यासह शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यापन कार्याला प्राधान्य देण्याची मागणी
शिक्षक भारती संघटनेने शिक्षकांच्या अध्यापन कार्याला प्राधान्य देत अतिरिक्त जबाबदाऱ्यांचे वाटप करताना न्याय, पारदर्शकता आणि समतोल राखावा, अशी मागणी केली. शिक्षणाची गुणवत्ता अबाधित ठेवत शासनाच्या विविध कामांमध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असले तरी जबाबदाऱ्यांचे समान वाटप आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
संघटनेचा निर्धार
“एकजूट शिक्षकांची, संरक्षण हक्कांचे” या ब्रीदवाक्यानुसार शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षक भारती संघटना कटिबद्ध असून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे यावेळी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.


