वाशिम : बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या सरसकट व विनाअट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करत असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. बुधवारी रात्री अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम शहराजवळील रिसोड मार्ग बायपासवर शेतकऱ्यांनी टायर जाळून तीव्र आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी देण्याची मागणी केली. सततच्या नैसर्गिक संकटांमुळे आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तुपकर यांच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. तसेच तुपकर यांच्या प्रकृतीला काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची राहील, असेही आंदोलकांनी म्हटले. दरम्यान, महामार्गावर झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.