जाफ्राबाद : सिपोरा व देऊळझरी शिवारातील शेतजमिनीच्या वादातून शेतातील पाण्याची पाईपलाईन वारंवार फोडण्यात येत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकरी दिनकर त्र्यंबक भुसारी यांनी शुक्रवार, १९ जून रोजी जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मौजे सिपोरा येथील गट क्रमांक ३४६ तसेच देऊळझरी येथील गट क्रमांक ११७ मधील शेतकरी असलेल्या भुसारी यांनी यापूर्वी प्रशासनाला निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला होता. शेतातील पाण्याची पाईपलाईन वारंवार जाणीवपूर्वक फोडण्यात येत असून, तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. भुसारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी काही गैरअर्जदारांनी शेतातील अवजारांचा वापर करून पाईपलाईन फोडली. तसेच पाईपलाईनमध्ये दगड व कपडे टाकून ती निकामी करण्यात आली. मागील महिनाभरापासून हा प्रकार सातत्याने घडत असून त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकदा पोलिसांकडून पाहणी करण्यात आली, आरोपींना समजही देण्यात आली; मात्र काही दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर दिनकर भुसारी यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस अंमलदार पी. ए. डोईफोडे, वाघ, नारायण गिराम, खार्डे, विजय जाधव, स्वाती पंडित यांनी प्रसंगावधान राखत भुसारी यांना ताब्यात घेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.