जालना : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात आंब्यांची झाडे अवैधरित्या तोडल्याप्रकरणी वनविभागाकडून एकाविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात आंब्यांची झाडे अवैधरित्या तोडल्याप्रकरणी वनविभागाकडून एकाविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला.
भोकरदन तालुक्यात बेसुमार वृक्षतोड केली जात असल्याची बातमी ‘दैनिक महाभूमि’ ने शनिवार, 19 एप्रिल रोजी प्रकाशित केली होती. जालना जिल्ह्यातील उत्तर विभागात वनविभागाचे क्षेत्र आहे. याशिवाय या भागात कृषी क्षेत्रातही विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या भागात लाकूड माफियांकडून बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे या भागातील वनसंपदा धोक्यात आली आहे. दैनिक महाभूमिने याबाबत बातमी प्रकाशित करताच वनविभागाने लाकूड माफियांवर कारवाई सुरू केली.
पारध ते धामणगाव रस्त्यावरील बाजूस आंब्याच्याच्या झाडाची अवैध तोड करून साठवणूक करण्यात आली होती. अवैध आंबा गोलनग माल 17 नग दिसून आले. हा साठा जप्त करण्यात आला असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 2, 52, 41, 42, 69, 74, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 1, 3 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम 31, अन्वये कलीम करीम शहा ( रा .अवघडराव सांवगी ) याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील रोहयो व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक सुदाम मुंडे, जालना उत्तर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी के .डी नागरगोजे यांच्या नेतृत्वात वनपरिमंडळ अधिकारी वाय.एम,डोमळे, वनरक्षक डी.व्ही पवार, जयाजी शिनगारे, घनशाम गव्हाणे, मोमिन तडवी यांनी संयुक्तरित्या केली.
कठोर कारवाई केली जाईल
जालना जिल्ह्यात कुठेही अवैधरित्या वृक्षतोड करण्यात येत असेल तर नागरिकांनी माहिती द्यावी. त्याविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई केली जाईल. अवैध वृत्तबद्ध करणे हा वन कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.
– सुदाम मुंडे, सहायक वनसंरक्षक, रोहयो व वन्यजीव, जालना.