घनसावंगी : शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते सतीश घाटगे यांनी केलेले आंदोलन आणि ‘दैनिक महाभूमि’ ने याबाबत मांडलेला सडेतोड वृत्तांत यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाला शहागड बंधाऱ्यात पाणी सोडण्यास भाग पाडले.

अजय गाढे /घनसावंगी : शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते सतीश घाटगे यांनी केलेले आंदोलन आणि ‘दैनिक महाभूमि’ ने याबाबत मांडलेला सडेतोड वृत्तांत यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाला शहागड बंधाऱ्यात पाणी सोडण्यास भाग पाडले. मंगळवार, 6 में रोजी तळणेवाडी सीआर गेटमधून शहागडच्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. या निर्णयामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मागील काही काळापासून गोदाकाठ परिसरातील शेतकरी पाण्याची मागणी करत होते. पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाही पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. या पार्श्वभूमीवर, सतीश घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. तसेच जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून वस्तुस्थिती मांडली होती. बंधाऱ्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. अखेर, या प्रयत्नांना यश आले असून मंगळवारी सायंकाळपर्यंत तळणेवाडी सीआर गेटमधून शहागड बंधाऱ्याच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले. यामुळे परिसरातील ऊस, फळबागा आणि इतर पिकांना जीवदान मिळणार आहे. पाण्याची तीव्र अडचण दूर झाल्याने गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ‘तुमच्या प्रयत्नांमुळेच पाणी आले, आम्ही आपले ऋणी आहोत, अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध
शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध असून जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो.
सतिश घाटगे,
चेअरमन, समृध्दी साखर कारखाना, भाजप नेते.