Chhatrapati Sambhajinagar Crime News : सोशल मीडियावर आलेल्या जाहिरात पाहून शेअर खरेदीच्या प्रेमात पडलेल्या एकाला बोगस कंपनीने तब्बल १३ लाख ४५ हजार रुपयांना चुना लावला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर आलेल्या जाहिरात पाहून शेअर खरेदीच्या प्रेमात पडलेल्या एकाला बोगस कंपनीने तब्बल १३ लाख ४५ हजार रुपयांना चुना लावला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास चांगो पाटील (रा. राजयोग अपार्टमेंट सिडको, वाळूज महानगर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ८ मे रोजी त्यांना त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर जॉर्जिय फायनान्शिअल सर्विस लिमिटेड या कोची राज्य केरळ येथील एका कंपनीची जाहिरात वाचण्यात आली. कंपनीची जाहिरात वाचून ते कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन झाले. त्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये १३१ सदस्य होते. त्यानंतर या ग्रुपचा ॲडव्हायझर जयंत पेरीमल याच्या मोबाइल नंबरवरून सर्व सदस्यांना शेअर मार्केटमधील बायसिल स्टॉक आयपीओ याबाबत माहिती मिळायची. त्यानंतर कंपनीने एक लिंक पाठवत सर्व सदस्यांना आपले स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे याबाबत माहिती दिली. फिर्यादींनी त्या लिंकवर जात कंपनीचे ॲप डाऊनलोड करीत कंपनीकडे शेअर्स खरेदीसाठी रजिस्ट्रेशन केले. या ॲपवरून जयंत परिमल यांच्या सल्ल्यानुसार फिर्यादींनी स्टॉक आयपीओ बाय सेल विकत घेतले आणि विकले. त्यानंतर ग्रुप ॲडमिनने फोन करून सांगितले की, तुम्ही ॲक्सिस बँकेचे खातेधारक सागर असोसिएट यांच्या जयपुर टिळकनगर येथील बँक खात्यावर पैसे भरा. त्यानंतर शेअर रोज खरेदी विक्री करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादींनी १० मे ते २५ मे दरम्यान १३ लाख ४५ हजार ७०६ रुपये नेट बँकिंगद्वारे भरणा केले. मात्र त्यानंतर ग्रुप ॲडमिन तसेच इतरांनी संपर्कच बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजूरकर हे करीत आहेत.