शेगाव : आषाढी एकादशी निमित्त संत नगरी शेगाव येथे 6 जुलै रोजी हजारो भाविकांनी गजानन महाराज मंदिरात गण गण गणात बोते आणि जय हरी विठ्ठलाचा नामघोष करत श्रीं च्या चरणी माथा टेकून प्रतिरूप विठ्ठलाचे दर्शन घेतले.

अनुप गवळी / शेगाव : आषाढी एकादशी निमित्त संत नगरी शेगाव येथे 6 जुलै रोजी हजारो भाविकांनी गजानन महाराज मंदिरात गण गण गणात बोते आणि जय हरी विठ्ठलाचा नामघोष करत श्रीं च्या चरणी माथा टेकून प्रतिरूप विठ्ठलाचे दर्शन घेतले.
विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले. पंढरपूरला जाण्यास असमर्थ असलेले विदर्भ, मराठवाडा, खान्देश मधील भाविक मोठ्या संख्येने श्री संत गजानन महाराज आणि विठुरायाच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झाले आहेत. श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव हे स्वच्छता, सेवा आणि शिस्त या त्रिसूत्रीसाठी देशभरात ओळखले जाते. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून 5 व 6 जुलै रोजी दिवसरात्र मंदिराचे दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत. शेकडो सेवेकरी कोणत्याही भाविकाला त्रास होऊ नये, यासाठी अहोरात्र सेवा देत होते.
भाविकांसाठी विशेष सोयी
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसोबत लहान लेकरं आणि अबालवृद्धांसाठी श्री संस्थानच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना थेट रांगेत न लागता श्रींच्या भुयार दर्शनापर्यंत विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या श्रींच्या दर्शनासाठी तीन तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असली तरी, भाविक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत गण गण गणात बोते आणि जय हरी विठ्ठल चा नामघोष करत दर्शन घेतांना दिसून आले.
महाप्रसाद आणि अध्यात्मिक कार्यक्रम
आषाढी एकादशीनिमित्त श्री संस्थानच्या वतीने भाविकांसाठी दिवसभर मोफत फराळाची व्यवस्था करण्यात आली. तसेच, दिवसभर कीर्तन, प्रवचन, श्रींच्या रजत मुखवट्याची परिक्रमा यांसारखे विविध अध्यात्मिक उपक्रम नित्यनियमाने पार पडत आहेत, ज्यात राज्यभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने आपली सेवा अर्पण करतांना दिसून आले.