जालना : आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्हयात गावोगावी दिंड्या पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा रविवार, 6 जुलै रोजी भरला. जालना शहरातील श्री. आनंदी स्वामींच्या पालखी मिरवणूक सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी वारकरी भजनी मंडळी, ढोल ताशा पथक, मल्लखांब, दंड फिरवणे, लाठ्याकाठ्या फिरवणे, लेझिम, फुगडी आदी कार्यक्रमात भाविक अक्षरशः दंग झाले. सकाळी निघालेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

विनोद काळे/ जालना : आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्हयात गावोगावी दिंड्या पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा रविवार, 6 जुलै रोजी भरला. जालना शहरातील श्री. आनंदी स्वामींच्या पालखी मिरवणूक सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी वारकरी भजनी मंडळी, ढोल ताशा पथक, मल्लखांब, दंड फिरवणे, लाठ्याकाठ्या फिरवणे, लेझिम, फुगडी आदी कार्यक्रमात भाविक अक्षरशः दंग झाले. सकाळी निघालेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

येथील संत श्री. आनंदी स्वामींनी जेथे समाधी घेतली त्या जुना जालना शहरातील मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी यात्रौत्सव साजरा केला जातो. संत आनंदी स्वामी यांनी इ.स. 1726 मध्ये समाधी घेतली होती. जुना जालना भागातील त्यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार सरसेनापती महादजी शिंदे यांनी केल्याचे सांगण्यात येते. येथील मंदिर हे 300 वर्षांपूर्वीचे आहे. सागवानी लाकडांचा वापर करून हे तीन मजली मंदिर बांधण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. आषाढी एकादशीनिमित्त या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज स्वामींच्या मूर्तीला विविध देवदेवतांची रूपे देण्यात आली. रविवारी आषाढी एकादशीनिमित्त आनंदी स्वामींच्या मूर्तीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मिरवणूक मार्गांवर दर्शनासाठी मोठया संख्येने गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त शनी मंदिर परिसरात यात्रा भरलेली होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
थरारक कसरतींनी वेधले लक्ष
श्री. आनंदी स्वामींच्या पालखी मिरवणूक सोहळ्यात मल्लखांब, दांडपट्टा चालवणे, लाठ्या काठ्या चालवणे, दंड फिरवणे यासारख्या कसरतींनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय ढोल ताशांच्या पथकातील संघाने सामुहिक वादन करून मंत्रमुग्ध केले.
फराळाचे वाटप
आषाढी एकादशीनिमित्त अनेक सामाजिक कार्यकर्ते, भाविकांनी भक्तांसाठी उसळ, केळी, चहा, दुध, उपवास चिवडा आदी फराळाचे वाटप केले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी फराळाचा आस्वाद घेतला.