Buldhana Diwali Market: आठ दिवसांवर दिवाळी आली आहे. येत्या रविवारपासून दिवाळी सुरू होणार आहे. तत्पूर्वी आलेल्या रविवारच्या आठवडी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. वस्तु, कपडे, खाद्यपदार्थ खरेदीसाठी बाजारपेठेतील गल्लोगलीत अनेक प्रतिष्ठाणे लावण्यात आली असून, ग्राहकांची झुंबड दिसू लागली आहे.
बुलढाणा : आठ दिवसांवर दिवाळी आली आहे. येत्या रविवारपासून दिवाळी सुरू होणार आहे. तत्पूर्वी आलेल्या रविवारच्या आठवडी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. वस्तु, कपडे, खाद्यपदार्थ खरेदीसाठी बाजारपेठेतील गल्लोगलीत अनेक प्रतिष्ठाणे लावण्यात आली असून, ग्राहकांची झुंबड दिसू लागली आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीमूळे बाजारात नवचैतन्य पहायला मिळाले.
लक्ष लक्ष दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपावली. प्रकाशाचा उत्सव असलेला हा सण आनंदात साजरा करण्याची परंपरा आहे. तमाम भारतीयांकरीता प्रकाशाचे पर्व ठरलेल्या दीपोत्सवात शुभकार्याचा श्री गणेशा केला जातो. प्रत्येकाच्या अंगणी दिवा लागतो, रांगोळी काढली जाते, कुटुंबातील सर्वसदस्य नवीन कपडे परिधान करून उत्सव साजरा करतात. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. पाहुण्या मंडळीला फराळ वाटण्यात येते. सुखदुखाची देवाणघेवाण आणि विचारांची आदानप्रदान केली जाते. नात्यांमध्ये आपुलकीचा गंध दरवळतो. तत्पूर्वी दिवाळी उत्साहात साजरा करण्यासाठी नवीन वस्तु खरेदी करण्यासाठी नागरिक कुटुंबासमवेत घराबाहेर पडत आहेत. दिवाळीचा मुहूर्त साधून अनेकजण सोने, चांदीचे दागिने खरेदी करतात. यामुळे, ज्वेलरी दुकांनामध्ये देखील गर्दी दिसून येते आहे.
पूजा साहित्यांची मागणी
लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य जसे की, फोटो, झाडू, लक्ष्मीची पाऊले, गोल्डन रांगोळी, स्टिकर्स रांगोळी, डिझाइन पट्टया, शुभ-लाभ स्टिकर्स, गाय-वासरू, मोर, गणपती बाप्पा, स्वस्तिक, नारळाचे शुभ- लाभ आदी साहित्य बाजारात दाखल झाले आहे. सौभाग्यवतींसाठी हळदी- कुंकवाची पावले, पणत्या स्टॅण्ड, रंगीत पणत्या, मोठ्या पणत्या, बत्तासे, प्रसाद तसेच घरावर विद्युत रोष नाही करण्यासाठी लाइटिंग आदी गोष्टीही बाजारात उपलब्ध आहेत.
कोर्टलाईन परिसर बनले कपड्यांचे मार्केट !
शहरातील कारंजा चौक व कोर्टलाईन परिसर जणू कपड्यांचे मार्केट बनले आहे. इथे मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने लावण्यात आली असून, खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येते आहे.
दर वाढले तरी खरेदी उत्साहात
पूजेचे साहित्य तसेच इतर उपयोगी वस्तूंमध्ये 10 ते 12 टक्यांनी दर वाढ झाली आहे. मात्र, विक्रीवर परिणाम काही दिसत नाही. दिवाळी आनंदोत्सव आहे. नव्या वस्तुखरेदी करण्यात नागरिकांचा उत्साह दिसून येतो.
राहुल पाटील, पूजा साहित्य विक्रेते